बारामती बसस्थानकाने राज्यातील ‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात’ १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटीपपणाच्या संकल्पनांना साकार करणाऱ्या या कामगिरीमुळे बारामतीचा राज्यभर गौरव झाला आहे.
या यशानंतर सोशल मीडियावर अनेकांकडून या कामगिरीचे श्रेय स्व. माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना दिले जात आहे. सन २०२५-२६ च्या सर्वेक्षणात बारामती बसस्थानकाला ९७ गुण मिळाले. एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जून रोजी मुंबई येथे बक्षीस वितरण होणार आहे. राज्यातील ५४ उत्कृष्ट बसस्थानकांना एकूण ३ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
या अभियानामुळे बसस्थानकांतील स्वच्छता, प्रवासी सुविधा, सुशोभीकरण आणि व्यवस्थापनात लक्षणीय सुधारणा झाली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.




