बारामती । फेसबुकवर स्वस्त गहू देण्याचे आमिष दाखवून धाक दाखवत एकाची लुट करण्यात आली आहे. या प्रकरणी तासगाव येथील व्यापाऱ्याला बारामतीत बोलावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत लुटणाऱ्या चौघांना बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. 2 पिस्तुसांसह आरोपींकडून 8 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सूरज गावडे (रा. तासगाव) यांना फेसबुक मार्केटप्लेसवरील जाहिरातीद्वारे बारामतीत बोलावण्यात आले होते. आरोपींनी त्यांना निर्जन ठिकाणी नेऊन पिस्तूलाचा धाक दाखवत मारहाण करत रोख रक्कम, दागिने आणि घड्याळ लुटले.
घटनेनंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. यानंतर सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या हालचालींचा मागावा घेत विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. थरारक पाठलागानंतर भिगवण परिसरात तिघांना गाडीसह ताब्यात घेण्यात आले, तर चौथ्या आरोपीला घरातून अटक करण्यात आली.
या कारवाईत दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रवी संजय माने (रा. वंजारवाडी, ता. बारामती), श्रीकांत अर्जुन घुले (रा. ढेकळवाडी, ता. बारामती), अभिषेक भाऊसो ठोंबरे (रा. ढेकळवाडी, ता. बारामती) आणि अतुल मोहन भोलणकर (रा. वंजारवाडी, ता. बारामती) यांना अटक करण्यात आली आहे.




