परभणी जिल्ह्यातील यशवडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील सभामंडप अचानक कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना मोठ्या संख्येने भाविक सभामंडपात उपस्थित होते. याचवेळी मंडपाचा काही भाग अचानक कोसळला. दुर्घटनेनंतर एकच गोंधळ उडाला असून अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. बचाव पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बांधकामातील त्रुटी किंवा क्षमतेपेक्षा अधिक गर्दी याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.




