सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राजेंद्र जैन यांना संधी; राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी पक्षाने अखेर उमेदवाराची घोषणा केली आहे. राज्यसभा सदस्य झाल्यानंतर रिक्त झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी ही अधिकृत घोषणा केली. राजेंद्र जैन हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून संघटनात्मक पातळीवर त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. त्यांच्या नावावर पक्षाने विश्वास दाखवत विधानपरिषदेची संधी दिली आहे.
दरम्यान, या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक आणि राजकीय समीकरणांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पक्षातील अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असताना अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सुनील तटकरे यांनी सांगितले की, पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून आगामी काळात राजेंद्र जैन पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




