क्राइम

पुण्यातील रावेत परिसरात फर्निचर दुकानावर थरारक गोळीबार; पाच राउंड फायरिंगने खळबळ

पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात शुक्रवारी रात्री एका फर्निचर दुकानावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोर दुकानाजवळ आले आणि त्यांनी अचानक फायरिंग सुरू केली. यावेळी अंदाजे पाच राउंड गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे रावेत परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *