मदुराई येथील न्यायालयाने तामिळनाडूमधील गाजलेल्या सत्तनकुलम कस्टोडियल डेथ प्रकरणात 9 पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. जून 2020 मध्ये घडलेल्या या घटनेत वडील पी. जयाराज आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता.
कोरोना काळात लॉकडाउन्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली होती. मात्र, पोलीस ठाण्यात त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा आरोप होता. काही दिवसांतच दोघांचा मृत्यू झाला आणि या घटनेने संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे समोर आले.
सर्व पुरावे आणि साक्षींचा विचार करून न्यायालयाने 9 पोलिसांना दोषी ठरवत हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (rarest of rare) प्रकारात मोडतो असे नमूद केले. त्यानुसार सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.




