Home

मशरूम शेती युनिटमध्ये भीषण दुर्घटना, ३ कामगारांचा जागीच मृत्यू

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात एका मशरूम शेती युनिटमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ड्रेनेज (गटार) टाकी साफ करताना विषारी वायूचा श्वास घेतल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मशरूम युनिटमधील ड्रेनेज टाकी स्वच्छ करण्यासाठी काही कामगार खाली उतरले होते. मात्र, टाकीत साचलेल्या घाणीतून निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे ते अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

विषारी वायूचा धोका

ड्रेनेज किंवा सेप्टिक टाक्यांमध्ये हायड्रोजन सल्फाइड (H₂S) आणि मीथेनसारखे अत्यंत घातक वायू तयार होतात. हे वायू रंगहीन आणि गंधहीन असू शकतात, त्यामुळे त्यांची उपस्थिती लक्षात येत नाही. अल्पावधीतच श्वसनक्रियेला अडथळा निर्माण होऊन जीवितहानी होऊ शकते.

तपास सुरू

या धक्कादायक घटनेची नोंद जेजुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संबंधित कामगारांनी कोणतीही सुरक्षा साधने (मास्क, ऑक्सिजन सपोर्ट) वापरली होती का, याची चौकशी केली जात आहे. तसेच, मशरूम युनिटच्या मालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *