आंतरराष्ट्रीय आरोग्य क्राइम क्रीडा मनोरंजन राजकीय शेती संपादकीय सामाजिक

आपली उंची किती? आपला आवाका किती? आपण बोलतो किती?

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अनेक जण शंका व्यक्त करत आहेत. या प्रकरणात ना जात आणली जात आहे ना धर्म; पण या घटनेवर बोलताना राज्यातील नेते पक्षीय सीमा देखील बाजूला ठेवताना दिसतात. मात्र या सगळ्यात काही स्थानिक नेते आपल्या आवाक्या बाहेर जात आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होतो. ज्या नेत्यांच्या निधनानंतर प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी दुःख व्यक्त केले, त्या नेत्यांच्या बाबतीत गलिच्छ राजकारण करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभते का, हेही लक्षात घ्यायला हवं होतं.

पत्रकार कोणाचाच नसतो, त्याला जात किंवा धर्म नसतो. पत्रकाराला कोणाच्या सुख-दुःखाशी बांधिलकीही नसते. तरीही अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक पत्रकारांचेही डोळे पाणावले. असो, ‘दादा’ काय होते हे तुम्हा वाचकांना सांगण्याची गरज नाही. पण राजकारण्यांनी कोणत्या गोष्टीचे भांडवल करावे यालाही काही मर्यादा असाव्यात का?

हे सांगण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांत एका पक्षाच्या युवा पदाधिकाऱ्यांनी मांडलेला मुद्दा. मुद्दा असा की, रोहित पवार यांच्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे अजित पवार यांचा विमान अपघात झाला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कारखान्याच्या धुराचा पर्यावरण, नागरिकांचे आरोग्य आणि विमानतळ परिसरातील दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. मात्र हा मुद्दा मांडताना राजकारणाचा चष्मा लावला गेला असल्याचे दिसते. कारण रोहित पवार स्वतः अजित पवार यांचा अपघात नसून घात असल्याचे सांगत विविध पुरावे मांडत आहेत. मग या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सवालही उपस्थित होतो.

खरंतर अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, असे ते सातत्याने सांगत असत आणि जनमानसातही त्यांची तशीच प्रतिमा होती. परंतु कोणत्याही मुद्द्याचे भांडवल करून राजकारण होत असल्याचं या दुर्घटनेबाबतही दिसून येत आहे. कोणी कोणते विषय मांडवे हा त्याचा वैयक्तिक विषय असला, तरी त्या विषयांचे भांडवल कसे केले जाते यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: अजित पवारांची आठवण सांगताना भावूक झाल्याचं आपण पाहिलं आहे. याशिवाय अजित दादांच्या विधानभवन परिसरातील स्मारकाचीही त्यांनी घोषणा केली. पुण्यातील उड्डाणपूलाला अजित पवारांचे नाव देण्याचा निर्णयही त्यांनी दिला मग स्थानिक पातळीवरील हे असे मुद्दे मांडणं योग्य ठरतं आहे का? थोडक्यात यात पक्ष बाजूला ठेवला जातो आहे. पण स्थानिक पातळीवर मात्र राजकीय भांडवल केलं जातं हे कितपत योग्य?

दुसरा मुद्दा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयाला अजित पवार यांचे नाव देण्याचा. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्या संलग्न रुग्णालयांची नावे वेगवेगळी आहेत. त्याचप्रमाणे बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे आहे. सरकारने काढलेल्या आदेशानुसार या महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाचे नाव ‘स्व. अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती’ असे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयावर काही हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे. ज्या अजित पवार यांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता काम केले, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावालाच विरोध करून राजकीय पोळी भाजून येत्या निवडणुकांसाठीचं हे भांडवल केलं जाताना दिसतं आहे. हे सगळं पाहता दिवंगत अजित पवार यांचा डायलॅाग आठवतो

आपली उंची किती आणि आपला आवाका किती हे आधी बघितलं पाहिजे – अजित पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *