शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच त्यांनी अखेर याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, राजकीय निर्णयाबाबत त्यांनी अद्याप कोणतेही संकेत दिले नसून अंतिम निर्णय मतदारसंघातील जनतेशी चर्चा केल्यानंतरच जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी माझ्या मतदारसंघातील जनतेशी जाऊन बोलेन. त्यानंतर माझा राजकीय निर्णय जाहीर करीन.”
तसेच, सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्याबाबत कोणत्याही प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया दिलेली नाही.
“माझी भूमिका काहीही असली तरी मी आजही उद्धव साहेबांबद्दल आणि आदित्यजींबद्दल काहीच बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. माझी राजकीय भूमिका काहीही असली तरी ती मी माझ्या लोकांशी चर्चा करूनच ठरवेन,” असेही त्यांनी सांगितले.
ओमराजे निंबाळकर यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चांना आणखी वेग आला असून, ते नेमका कोणता निर्णय घेतात याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




