अजित पवारांचा विमान अपघात कसा घडला?, AAIB कडून मोठे खुलासे

बारामती : 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या Learjet 45XR (VT-SSK) विमान अपघाताबाबतचा प्राथमिक तपास अहवाल जाहीर करण्यात आला आहे. भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. मात्र हा अहवाल प्राथमिक असून अंतिम निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अपघात कसा घडला?

मुंबईहून बारामतीकडे VIP चार्टर उड्डाण करणारे हे विमान सकाळी सुमारे 8:46 वाजता लँडिंगदरम्यान कोसळले. विमानात दोन पायलट, एक केबिन क्रू आणि दोन प्रवासी असे एकूण पाच जण होते. अपघातात सर्वांचा मृत्यू झाला.

अहवालानुसार, विमानाने प्रथम धावपट्टी क्रमांक 11 वर उतरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी टॉवरकडून दृश्यमानता 3 किमी असल्याची माहिती देण्यात आली. मात्र VFR (Visual Flight Rules) अंतर्गत उड्डाणासाठी किमान 5 किमी दृश्यमानता आवश्यक असते.

पहिल्या प्रयत्नात पायलटने ‘गो-अराउंड’ केले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात पायलटने “Field in sight” असे कळवले आणि लँडिंग क्लीअरन्स देण्यात आले. काही क्षणांतच कॉकपिटमधून “Oh St… Oh St…” असा आवाज नोंदवला गेला आणि विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूस सुमारे 50 मीटर अंतरावर कोसळले. विमान झाडांना धडकून खाली पडले आणि लगेचच त्याला आग लागली.

हवामान आणि विमानतळाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह

प्राथमिक अहवालात बारामती विमानतळावरील मर्यादित सुविधांबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.
• बारामती हे ‘Uncontrolled Airfield’ आहे.
• येथे अधिकृत हवामान (MET) सुविधा उपलब्ध नाही.
• धावपट्टीवरील मार्किंग फिकट झालेले होते.
• धावपट्टीवर सैल खडी आढळली.
• रनवे 11 बाजूस विंडसॉक उपलब्ध नव्हता.
• स्वतंत्र अग्निशमन (ARFF) युनिट उपलब्ध नव्हते.

अपघाताच्या वेळी 3 किमी दृश्यमानता नोंदवली गेली असली, तरी त्याच कालावधीत पुणे आणि मुंबई येथे 2 ते 2.5 किमीपर्यंत दृश्यमानता होती. उपग्रह चित्रांमध्ये बारामती परिसरात हलके धुके असल्याचे दिसून आले आहे.

पायलट्सचा अनुभव

विमानाचे कॅप्टन 61 वर्षीय ATPL धारक असून त्यांचा एकूण उड्डाण अनुभव 18,855 तासांचा होता. Learjet प्रकारावर त्यांना 2,800 हून अधिक तासांचा अनुभव होता. सह-पायलट 25 वर्षीय CPL धारक असून त्यांचा एकूण अनुभव 2,490 तासांचा होता. दोघांनाही बारामती विमानतळाचा पूर्वानुभव होता.

उड्डाणापूर्वी दोन्ही पायलट्सची ‘ब्रिथ अॅनालायझर’ चाचणी करण्यात आली होती आणि ती निगेटिव्ह आढळली.

ब्लॅक बॉक्स तपास सुरू

विमानातील Flight Data Recorder (FDR) मधील डेटा यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. Cockpit Voice Recorder (CVR) आगीमुळे नुकसानग्रस्त झाला असून त्यातील डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेतील NTSB ची मदत घेतली जात आहे.

DGCA ला तात्पुरत्या सुरक्षा शिफारसी

प्राथमिक निष्कर्षांच्या आधारे AAIB ने DGCA ला काही तात्पुरत्या शिफारसी केल्या आहेत :
• Uncontrolled Airfield वर VFR नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे.
• हवामान सुविधा आणि लँडिंग सहाय्य साधने सुधारावीत.
• अशा विमानतळांची नियमित सुरक्षा तपासणी करावी.
• अशा विमानतळांना परवानाधारक दर्जा देण्याची शक्यता तपासावी.

अंतिम निष्कर्ष अद्याप बाकी

AAIB ने स्पष्ट केले आहे की हा केवळ प्राथमिक अहवाल आहे. अंतिम तपास अहवालात अपघाताचे मूळ कारण (Root Cause) आणि सहायक कारणे (Contributory Factors) निश्चित केली जातील.

दरम्यान, या अपघातामुळे बारामती विमानतळाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, VIP उड्डाणे आणि Uncontrolled Airfield वरील ऑपरेशन्सच्या नियमांविषयी व्यापक चर्चा सुरू झाली आहे.