पुणे पुस्तक महोत्सवाचा भव्य समारोप; साडे बारा लाख वाचकांची उपस्थिती, ५० कोटींहून अधिक उलाढाल
पुणे पुस्तक महोत्सवाचा भव्य समारोप; साडे बारा लाख वाचकांची उपस्थिती, ५० कोटींहून अधिक उलाढाल
पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात झाली असून, पुणेकरांनी हा महोत्सव अक्षरशः आपल्या घरचा समजून भरभरून प्रतिसाद दिला. मागील आठ दिवसांत तब्बल साडे बारा लाख वाचकांनी या महोत्सवाला भेट दिली.
या कालावधीत ३० लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री झाली असून, सुमारे ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाल्याची माहिती समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महोत्सवाच्या काळात देशभरातील अनेक नामवंत लेखकांनी उपस्थिती लावली. यावेळी विविध प्रकाशकांकडून ५०० हून अधिक नव्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच चिल्ड्रन्स कॉर्नरला पुणे व परिसरातील ४०० शाळांमधील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली, त्यामुळे हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठीही एक ज्ञानपर्व ठरला.
वाचक, लेखक, प्रकाशक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेला हा भव्यदिव्य महोत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, पुढील पुणे पुस्तक महोत्सव १२ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा संयोजक राजेश पांडे यांनी यावेळी केली.
